शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी गुरुवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवणारे एक पोस्टर झळकावले. त्यानंतर भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चिखलात दगड मारल्यानंतर आपल्या अंगावरही चिखल उडतो. त्यामुळे प्रत्येकाने मर्यादा ओळखून चाललेले बरे. तुम्ही आम्हाला काही बोलला नाहीत तर आम्हीही तुम्हाला काही बोलणार नाही. आम्हाला डिवचू नका, आम्ही कोणाला डिवचणार नाही. पण तुम्ही आमच्या अंगावर येत असाल तर आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत भरत गोगावले यांनी बंडखोर आमदारांना वारंवार गद्दार संबोधणाऱ्या आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले.
आम्हाला कोणाच्या घरादारापर्यंत जायचे नाही. त्यामुळे आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे एवढेच सांगू इच्छितो की, आपण मंडळींनी शिस्तीत राहावे, आम्हीही शिस्तीत राहू. आम्ही कोणाला डिवचणार नाही, असेही भरत गोगावले यांनी म्हटले.
आदित्य यांच्याविरोधात शिंदे गटाचे विडंबनात्मक पोस्टर
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाने बॅनर, घोषणांचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. बॅनरवर शिंदे गटाने ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज’ असा मथळ्याखालील बॅनर झळकावला. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट दिशेने बसलेले व्यंगचित्र आहे. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले. वर्ष २०१४ मध्ये १५१ चा हट्ट करत युती बुडवली,२०१९ मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा होती. त्यानंतर आदित्य ठाकरेही चांगलेच आक्रमक झाले होते. गद्दार आमदार एका मंत्रिपदासाठी विधिमंडळाबाहेर उभे राहून आंदोलन करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.