या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला संशयीत आरोपी हा ६० वर्षे वयाचा असून त्यास दारूचे व्यसन आहे. दोघांमध्ये पूर्वीपासूनचे वादही आहे. दिनांक २२ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आला. त्याने फिल्मी अंदाजात ५१ वर्षीय महिलेला, ‘तू खूप सुंदर दिसते, मला खूप आवडतेस, आपण दोघे फिरायला जावू’, असे म्हणत तिला प्रपोज केले. तसेच त्याने अश्लील हावभाव करून आपण मज्जा करून म्हणत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिला अश्लील भाषेत शिवीगाळही केली.
त्यानंतर पीडित महिलेने त्याला तुम्ही तुमच्या घरात जाऊन झोपा, मला त्रास देवू नका, असे म्हटले. महिलेने असे म्हटल्यानंतर चिडलेल्या ज्येष्ठ नागरिकाने तिला अश्लील भाषेत शिव्या दिल्या. तसेच महिलेला ऐकू जाईल अशा जोरदार आवाजात अश्लील गाणी म्हणून तिला त्रास दिला. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, हे गाणे गात या जेष्ठ नागरिकाने महिलेचा विनयभंग केला असे महिलेचे म्हणणे आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांमध्ये जागेवरून वाद असून याप्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे.