राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोकणच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवे आगर आणि श्रीवर्धन येथील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, बागा आदींची पवारांनी पाहणी केली. पवारांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. स्थानिकांनी पवारांसमोर त्यांच्या अडचणी सांगितल्या. आमच्या घराची कौलं उडाली. पत्रे उडाली. पिण्याचे पाणी नाही, वीज नाही, शेती नेस्तनाबूत झाली. नारळाची झाडे पडली. घरांची पडझड झाली. घराची डागडुजी करायची तर पैसे नाहीत. बँका बंद आहेत. राष्ट्रीय बँकाही बंद आहेत. बँकेत जाण्यासाठी महाडला जावं लागतं. तिथपर्यंत जाण्यासाठीही पैसे नाहीत, अशी व्यथा स्थानिकांनी पवारांसमोर मांडली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होते. यावेळी पवारांनी हिंमत दाखवली की आपण पुन्हा उभं राहू, असं सांगत स्थानिकांना धीर दिला.
त्यानंतर पवारांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना धान्य वाटप करण्यात आलं होतं. निसर्ग वादळामुळे या सर्वांचं धान्य भिजून गेलं आहे. त्या सर्वांसाठी नव्याने धान्य देता येऊ शकेल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील कामं देण्यात येतील. तसेच भात शेतीचं नुकसान झालेल्यांना लागेल ती मदत देऊ असं सांगतानाच उद्यापासून नुकसानग्रस्तांना गहू, तांदूळ आणि रॉकेलचं वितरण करण्यात येणार आहे, असं पवार म्हणाले.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines