“अजितदादा तुम्ही त्यावेळी (पहाटेचा शपथविधी) जरा घाईच केली, थोडं सबुरीनं घेतलं असतं, तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा…?”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन चिमटा काढला. “मला आजही आठवतंय दादा, जयंतराव त्यावेळी बोलले होते, की चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असता. तो कार्यक्रम फेलच झाला नसता, तुम्ही मला बोलायला हवं होतं…” , असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“दादांनी त्यावेळी वेगळा निर्णय घेतला. पहाटे पहाटे शपथ घेतली. त्यावेळी मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि फोनवर विचारलं की, तुम्ही टीव्ही बघितला का?, मी तर टीव्हीच बघत होतो… पण म्हटलं हे टीव्हीवाले कधीकधी मागचं पण दाखवतात.. पण मी नीट बघितलं तर टीव्हीवर फडणवीससाहेबही दिसले. आमचे प्रमुख मला म्हणाले की, मी जयंत पाटलांनाही फोन करतोय. पण ते फोन घेत नाहीयेत. त्यावर मी त्यांना म्हटलं, जयंतराव पण तिकडेच गेले आहेत. कारण जळगावचे आमदार अनिल पाटील तिकडे मला दिसले होते, ते पाठमोरे उभे असल्याने मला ते हुबेहुब जयंतरावांसारखे दिसले. त्यामुळे मी आमच्या प्रमुखांना सांगितलं की जयंत पाटील पण तिकडे गेले आहेत. पण, नंतर माहिती घेतली तेव्हा ते तिकडे गेले नव्हते. परंतु जयंतराव तिकडे गेले असते तर कार्यक्रम ओक्के झाला असता”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणताच सभागृहात खसखस पिकली.
एकनाथ शिंदे यांची जयंत पाटलांवर टोलेबाजी
जयंतराव मला काल तुम्ही मुख्यमंत्रिदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का? असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख काल तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कालच्या जयंत पाटलांच्या भाषणाला तोडीस तोड उत्तर दिलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “तुम्ही मला काल मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण अगोदर अजितदादांना विचारलं का? कारण दादांची दादागिरी नेहमी चालते… ती चालायला देखील हवी, कारण ते आमचे मित्र आहेत…. पण जयंतराव तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का? तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख काल तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं”