सुप्रीम कोर्टानं २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सोपवण्याचा निर्णय घेतला आणि २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आज देखील सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा उद्या निवृत्त होत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता नव्या सरन्यायाधीशांपुढं होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती यू.यू. ललित हे भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाची निर्मीती देखील नवे सरन्यायाधीश करण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटापुढं पर्याय काय?
सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरील ३२ पानांच्या यादीनुसार २ सप्टेंबरपर्यंतच्या कामकाजामध्ये महाराष्ट्रातील याचिकांचा समावेश करण्यात आलेला नाही. घटनापीठात कोणते पाच न्यायमूर्ती असतील याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुनावणी तातडीनं व्हावं असं वाटत असल्यासं त्यांच्यापुढे न्यायालयाला विनंती करण्याचा पर्याय शिल्लक आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी विनंती केल्यास सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी लवकर घेण्याबाबत विचार करु शकतं.