२००२ साली गुजरात येथे दंगा उसळला होता. या दंग्या दरम्यान ५ महिन्याची गर्भवती महिला बिलकीस बानोसह इतर काही महिलांचा बलात्कार करण्यात आला होता. तसेच बिल्कीस बानो हीच्या ३ वर्षांच्या मुलीसह ७ जणांची हत्या देखील करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजार केले होते. युक्तीवाद प्रक्रिया पार पडल्यानंतर तत्कालीन न्यायाधीश यु. डी. साळवी यांनी ११ दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र गुजरात न्यायालयांने या आरोपींची सुटका केली आहे. तसेच हे शिक्षा भोगत असलेले हे आरोपी बाहेर आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. ही लाजिरवाणी बाब असून हा घटनेने दिलेल्या न्यायप्रक्रियेचा अवमान असल्याचे मत सेवानिवृत्त तत्कालीन न्यायाधीश यु. डी. साळवी यांनी व्यक्त केलं आहे.
घडलेल्या घटनेतून संपूर्ण समाजाची मानसिकता प्रतीत होते. त्यामुळे हा घडलेला प्रकार बलात्कारापेक्षाही गंभीर प्रकार असल्याचे सेवानिवृत्त न्यायाधीश साळवी यांनी सांगितले. सामूहिक बलात्कारासारख्या प्रकारच्या घटना घडणे म्हणजे, समाज बिघडल्याची चिन्ह आहेत. या प्रकरणात दोषी आरोपींना झालेली शिक्षा ही त्यांना आयुष्यभर भोगायची होती. परंतु, त्या आरोपींना सोडायचा अधिकार तेथील सरकारचा आहे. तो त्यांनी कसा वापरला आहे हे फक्त आपण बघायला हवं, असेही ते पुढे म्हणाले.
एकाद्या आरोपीला शिक्षा करण्याचा उद्देश काय?, तर पहिली बाजू म्हणजे कुठलाही अपराध हा समाजाच्या विरुद्ध केलेले कृत्य असते. त्यात काही कृत्ये अशी असतात की त्यांनी समाजात राहणे हे धोकादायक असते. म्हणून त्याला समाजापासून विलग करून जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. तर दुसरी बाजू अशी की त्यांची तुरुंगात राहून काय सुधारणा होत आहे का?, त्याच्या मानसिकतेमध्ये काय सुधारणा होत आहे का हे पाहणे. परंतु या घटनेतून आरोपींच्या मानसिकतेमध्ये सुधार झाल्याचे दिसून येत नाही. ते आपला सत्कार स्वीकारत आहेत. त्यामुळे हे सगळे चुकीचे असल्याचे मत सेवानिवृत्त तत्कालीन न्यायाधीश यु. डी. साळवी यांनी व्यक्त केलं आहे.
सध्या या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारले असून नोटीस बजावत येत्या २ आठवड्यात या प्रकारणाचा सविस्तर जबाब मागितला आहे. परंतु, अशा प्रकारची घटना घडणे आणि या घटनेनंतर त्यातील दोषी आरोपींचा सत्कार होणे हे समाजासाठी लाजिरवाणं असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.