मुंबई: ‘लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक गोष्टींवरील निर्बंध उठले असताना नाभिक समाजावर अन्याय का? माननीय मुख्यमंत्री हे रोजच टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच आहे,’ असा खोचक टोला भाजपचे आमदार यांनी नाभिक समाजाची व्यथा मांडताना हाणला.

वाचा:

निसर्ग चक्रीवादळानं कोकणात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड भाजपच्या अन्य नेत्यांसोबत सध्या त्या भागाचा दौरा करत आहेत. गुहागरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी वादळामुळं झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर करोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही सलून उघडण्यास परवानगी नसल्यानं नाभिक समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. अनेक ठिकाणी नाभिक समाज निदर्शनं करीत आहे. कोकणातील नाभिक समाजानं हत्यारबंद आंदोलनाची हाक दिली आहे. याबाबत आमदार लाड यांना विचारलं असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. ‘आमच्या दाढ्या वाढल्या आहेत. पण मुख्यमंत्री रोज टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात, हा प्रश्न आम्हाला पडलाय. खरंतर नाभिक समाजावर अन्याय करण्याचं काही कारण नाही. एकीकडे तुम्ही मॉल, हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करता, मग एक टक्क्यापेक्षाही कमी असलेल्या नाभिक समाजावर अन्याय का?,’ अशी विचारणा त्यांनी केली. ‘कोविड १९ पासून काळजी घेण्याचे जे काही नियम इतरांना लावले जात आहेत, तेच नाभिक समाजाला लावून त्यांना देखील दुकानं उघडण्याची परवानगी सरकारनं द्यावी आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करावा,’ अशी विनंती त्यांनी यावेळी सरकारला केली.

वाचा:

ठाकरे सरकार कोकणातील जनतेला गृहित धरतंय!

‘निसर्ग चक्रीवादळामुळं कोकणात मन हेलावून टाकणारी परिस्थिती आहे. झाडं आणि घरं अक्षरश: रडत आहेत. इतकी भीषण परिस्थिती असताना ठाकरे सरकारनं कोकणला अवघी ७५ कोटींची मदत जाहीर केली आहे. वादळामुळं पडलेली झा़डं बाजूला काढून साफसफाई करायची म्हटलं तरी हे पैसे पुरणार नाहीत. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारनं ७५ कोटी रुपये देऊन जनतेची फसवणूक केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येऊन केवळ तहसीलदार व तलाठ्यांना भेटून गेले. त्यांनी गावांची पाहणी केली नाही. त्यांनी कोकणातल्या जनतेला गृहित धरलंय. कोकणातली जनता म्हणजे शिवसेनेची मालमत्ता आहे, अशा पद्धतीनं शिवसेना वागत असल्याचा घणाघाती आरोप लाड यांनी केला.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here