यानंतर प्रशांत बंब यांनीही शिक्षकाच्या पत्नीला प्रचंड सुनावले. तुम्ही जनतेचा पैसा खाऊन फुकटचा पगार घेता. मुलांना शिकवत नाही, तुम्ही मुलं बरबाद केलेत आतापर्यंत. तुमच्या मिस्टरांना विचारा, शाळेत काय सुरु आहे, असे प्रशांत बंब यांनी म्हटले. ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘आमदार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे’
भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाच्या फोनवरील संवादाची क्लिप गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या शिक्षकाने बंब यांच्या कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरावस्थेबाबत बोलायला सुरुवात केली. तुमच्या तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शौचालयं नाहीत, पत्रे उडाले आहेत. तुमचं या शाळांकडे लक्ष आहे का? तुम्ही सरकारी कायद्याबाबत इतकं बोलता, पण तुमच्या भागातील शाळांची तरी तुम्हाला काळजी आहे का, असा प्रश्न या शिक्षकाने विचारला. त्यावर प्रशांत बंब हे चांगलेच संतापले.
यानंतर प्रशांत बंब यांनी संबंधित शिक्षकाला चांगलेच सुनावले. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शौचालयं नसतील, मुलं उघड्यावर बसत असतील तर शिक्षकांना लाज वाटत नाही का, असे प्रशांत बंब यांनी म्हटले. त्यावर शिक्षकाने क्षणाचाही विलंब न लावता,’आमदार म्हणून तुम्हालाही लाज वाटली पाहिजे ना थोडी’, असे म्हटले.