Anand Dighe Death Anniversary Today: महाराष्ट्रात एका महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यावेळी दिवंगत आनंद दिघे यांची जोरदार चर्चा झाली. आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंचे गुरु आहेत. आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात एक घातपात असल्याचं सांगण्यात येत होतं. आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक होता की नाही हे आजपर्यंत उघड झालेलं नाही. ठाणे शहरातील टेंभी नाका भागात २७ जानेवारी १९५२ रोजी जन्मलेले आनंद चिंतामणी दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रभावित होऊन शिवसेनेशी जोडले गेले. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या आनंद दिघे यांनी ८०च्या दशकात वयाच्या १८व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९८४ मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बनले.

ठाण्याचे ‘बाळासाहेब ठाकरे’

दिघे यांनी आपल्या कार्यालयालाच त्यांचं निवासस्थान केलं होतं. राजकारणासोबत त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडवल्यामुळे ते लोकप्रिय झाले. दिघे यांच्याकडे एखादी समस्या घेऊन गेल्यानंतर तोडगा निघणारच हे निश्चित असायचं. त्या परिसरात त्यांची हीच मोठी ख्याती होती. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं, त्यांच्या समस्या सोडवणं यातूनच त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. ते कधीही लगेच भाषण करत नव्हते. बाहुबली नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटलं जाऊ लागलं.

‘आनंद आश्रम’

ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात शिवसेनेला आनंद दिघे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मिळाले होते. दिघे यांची मेहनत पाहून त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. दिघे जिल्हाध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी त्यांचं घर जवळपास सोडलंच होतं. ते त्यांच्या कार्यालयातच राहत होते. तिथेच ते झोपायचे असंही सांगितलं जातं. त्यानंतर टेंभी नाका भागात ‘आनंद आश्रम’ची स्थापना करण्यात आली. इथे रोज सकाळी अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येत होते. हेही वाचा – दिघेंसोबत काय घडलं याचे साक्षीदार होता तर २५ वर्ष का गप्प बसला? आनंद दिघेंच्या पुतण्याचा खडा सवाल

‘गद्दारांना माफी नाही’

मार्च १९८९ मध्ये ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेने जनता पक्षाशी हातमिळवणी करुन महापौरपदाचा दावा केला. पण मतदानावेळी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं. यावेळी आनंद दिघे यांनी गद्दारांना माफी नसल्याचं म्हटलं होतं. दिघे यांच्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली होती. त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मत दिल्याचं बोललं जात होतं.

नगरसेवकाच्या हत्येचा आरोप

या हत्येचा आरोप आनंद दिघेंवर लागला होता, पण आरोप सिद्ध होऊ शकला नाही. दिघे यांना अटकही करण्यात आली होती, पण नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिघे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र याचा त्यांना कोणताही फरक पडला नाही. ते जे काही करतात ते बाळासाहेबांच्या संमतीनेच करतात असं आनंद दिघे म्हणालचे. शिवसेनेचं आंदोलन असो की राज्य किंवा जिल्हा बंदी दिघे यांचा एक आवाजच यासाठी पुरेसा असायचा. दिघे असेपर्यंत ठाणे जिल्ह्यात दुसरे ‘साहेब’ कोणीही नव्हते. त्यांच्याशिवाय शिवसेनेच्या इतर कोणत्याही राजकारण्याच्या नावासमोर ‘साहेब’ हा शब्द वापरला जात नव्हता.

दिघे यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ

आनंद दिघे Armada गाडीतून प्रवास करायचे. ऑगस्ट २००१ मध्ये वंदना एसटी बस डेपोजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान २६ ऑगस्ट २००१ रोजी वयाच्या ५०व्या वर्षी यांचं निधन झालं. दिघे यांचा अपघात नाही, तर हत्या केल्याचं बोललं जातं होतं. हा घातपात होता की अपघात याबाबत अद्यापही आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यांच्या निधनाचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. त्यांच्या निधनाची बातमी कळताच रेमंड कंपनीच्या आवारात असलेल्या सिंघानिया रुग्णालयाची दिघे यांच्या कार्यकर्त्यांनी इतकी तोडफोड केली, जाळपोळ केली, की ते रुग्णालय पुन्हा सुरुच होऊ शकलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here