मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या समन्वयकांनी गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं की, कोणीही मध्ये काही बोललं किंवा काही विचारलं, तर मी बैठकीतून निघून जाईन. इतर काहीजणही तीच भाषा बोलत होते. त्यामुळे या बैठकीचे एकूण स्वरुप पूर्वनियोजित किंवा मॅनेज केल्यासारखे दिसत होते. कोणाच्या तरी राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाला वेठीस धरले जाऊ नये. ही बैठक मराठा आरक्षणासाठी बोलावली होती, पण आरक्षणावर एका वाक्याचीही चर्चा झाली नाही. या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध केला जात आहे, असे मराठा समन्वयकांनी म्हटले.
यावर तुम्हाला संभाजीराजे छत्रपती हेदेखील मॅनेज झाले आहे का, असा प्रश्न समन्वयकाला विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले की, कालचा एकंदरित प्रकार बघू तसंच दिसतंय. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आम्हाला बैठकीला बोलावले होते. मग सरकारने आमचं ऐकून घ्यायची तयारी दाखवली पाहिजे होती. शेवटी निर्णय सरकारच घेणार आहे ना? त्यामुळे आम्हाला ही बैठक मॅनेज असल्यासारखी वाटत होती, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संबंधित समन्वयकाने सांगितले. आता याचे काय पडसाद उमटतात, ते पाहावे लागेल.
‘एकनाथ शिंदे यांच्याभोवतीही बडव्यांचा गराडा’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बडव्यांनी घेरले आहे. जसे पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत. मराठा समाजाची बैठक बोलवली तर शेवटच्या घटकालाही बोलता आलं पाहिजे,अशा शब्दांत ‘शिवछत्रपती’ संघटनेचे नेते अमर देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला होता. सह्याद्री अतिथीगृहावरील गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे अनेक समन्वयक नाराज आहेत. कालच्या बैठकीत केवळ पहिल्या फळीतील लोकांना आणि त्यातूनही भाजपाशी जवळीक असणाऱ्या नेत्यांनाच बोलण्याची संधी देण्यात आली. इतरांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली, असा आरोप अमर देशमुख यांनी केला.