पाथरी तालुक्यातील विटा येथील स्नेहा हिचा विवाह माजलगाव येथील अशोक जालिंदर देशमाने याच्यासोबत झाला होता. विवाहाच्या एका महिन्यानंतर सासरच्या मंडळींने स्नेहा हिला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देण्यास सुरुवात केली. तर पती अशोक देशमाने यांनी स्नेहाला तू दिसायला चांगली नाहीस, तुला काम येत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये हुंडा कमी दिला आहे. मला नोकरीसाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, पैसे आणले नाहीस तर तुला नांदवणार नाही. असे म्हणून नेहमीच शिवीगाळ करत थापड बुक्क्यांनी मारहाण केली.
यामुळे स्नेहा हिने होणारा त्रास आपल्या आई-वडिलांना फोनवरून सांगितला. स्नेहाचे आई-वडील माजलगाव इथे आले व सासरच्या लोकांना स्नेहा अजून लहान आहे. तिचे काही चुकत असले तर समजून सांगा असे म्हणून निघून गेले. यानंतर सासरच्या लोकांनी आम्ही तुला पैसे घेऊन ये म्हटलं तर तू आई-वडिलांना बोलून आम्हाला भीती घालतेस का असे म्हणून थापड बुक्क्यांनी मारहाण करून स्नेहाला उपाशीपोटी ठेवले. मात्र, त्रास होत असल्याने स्नेहाने पुन्हा आपल्या वडिलांना त्रासाबद्दल माहिती दिली. स्नेहाचे वडील माजलगाव इथे आले असता सासरच्या व्यक्तींनी स्नेहाला व तिच्या वडिलांना घरातून हाकलून दिले.
या प्रकरणी स्नेहा अशोक देशमाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यामध्ये सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.