एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेना पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने भरारी घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली.
मला एक तगडा सहकारी मिळालाय
“संभाजी ब्रिगेडच्या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं यालाच काही लोक लोकशाही मानू लागले आहेत, बेताल वागायला आणि बोलायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात जो आमचा लढा सुरु आहे, तो केवळ शिवसेनेच्या भविष्याचा नाही तर तो देशामध्ये लोकशाही राहिल की बेबंदशाही राहिल, हे ठरवणारा तो ऐतिहासिक निकाल असेल. गेली महिना-दीड महिना शिवसेनेच्या विचारांशी जवळपासही नसणारे लोक मला येऊन भेटत आहेत. पाठिंबा देत आहेत. आता संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता वाचविण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, असं लोक भेटून सांगत आहेत. आज आम्ही संभाजी ब्रिगेडसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला एक तगडा सहकारी मिळालेला आहे, निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करु”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन युती झाली नाही, ही वैचारिक युती
“मी स्वागत एवढ्यासाठी केलं की आपण सगळे शिवप्रेमी आहोत. आपलं रक्त एक आहे. मला आनंद आहे, आज तुम्ही माझ्या साथीला आलेला आहात, विशेष म्हणजे आमच्याकडे सध्या काही देण्यासारखं नसताना देखील आमच्या साथीला आलेला आहात. पण तुमचे पुरोगामी शब्द वगैरे जरा कठीण आहेत, आमचं सगळं सोपं आहे.. आमचं हिंदुत्व, महाराष्ट्राची, मराठी माणसाची भूमिका रोखठोक आहे.. आमची ही भूमिका तुम्हाला पटल्यानेच तुम्ही आमच्या सोबत आलेला आहात.. मला नक्की खात्री आहे, आपली युती झाली ती काही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन झाली नाही, तसं जर असतं तर तुम्ही आता आमच्याकडे आला नसता. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. पण लढताना जे एकत्र येतात, त्यांचं शौर्य आणि साथ खूप महत्त्वाची असते. आज आपली वैचारिक युती झालेली आहे. आज महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलं ही शिवरायांच्या संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना उत्तर
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आज त्यावर बोलताना उद्धव म्हणाले, “असंगाशी संग तुटला, बरं झालं… मला अधिक काही बोलायचं नाही. त्यांनी बोलण्याअगोदर माझ्या भाषणाची नीट माहिती घेऊन बोललं तर बरं होईल”.