मुंबई टाइम्स टीम

चित्रपट जेवढा मोठा, खर्चिक, तेवढंच बड्या स्टार्सचं मानधनही तगडं असतं. स्टार मंडळी आपली किंमत पुरेपूर ‘वसूल’ करून घेतात. पण चित्रपट जर कमाई करण्यात अपयशी ठरला तर कलाकारांना इतकं मानधन द्यायचं का? त्यांनीही त्यांच्या मानधनात कपात करावी, अशी अपेक्षा चित्रपट निर्माते आणि सिनेवितरकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटाचं निर्मितीमूल्य जितकं मोठं असतं तितकंच मानधन कलाकारही घेतात. त्याचा भार निर्मात्यांवर पडतो. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायानुसार कलाकारांनी आपलं मानधन ठरवावं, असा सूर निर्मिती क्षेत्रातून उमटतोय.

बॉलिवूडमध्ये सध्या एकाहून एक मोठ्या चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘शमशेरा’, ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ असे मोठ्या बॅनरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे वळवण्यासाठी सिनेनिर्मात्यांनी काय करायला हवं याची चर्चा होऊ लागली आहे. मागील काही काळात अपयशी ठरणाऱ्या हिंदी चित्रपटांची यादी वाढतच चालली आहे. ‘बच्चन पांडे’, ‘रनवे ३३’, ‘हिरोपंती २’, ‘जयेशभाई जोरदार’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ असे अनेक चित्रपट जोरदार आपटले. अलीकडेच आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे बॉलिवूडवर चिंतेचे ढग जमा झालेत.
भाबीजी घर पर है मालिकेवर पाकिस्तानात बंदी, कारण काय आहे ते एकदा वाचाच
काही वर्षांपूर्वी आमिरच्या ‘दंगल’नं तसंच रणबीर कपूरच्या ‘संजू’नं सर्वाधिक कमाई केली होती. मात्र मागील काळातील त्यांच्या प्रदर्शित चित्रपटाला प्रेक्षकांनी म्हणावा तितका प्रतिसाद दिलेला नाही. अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटही अपयशी ठरला. या परिस्थितीवर चित्रपटसृष्टीतील अनेक जाणकारांनी आपली मतं व्यक्त करताना काही सल्लेही दिलेत. शाहरुख खानसोबत ‘रईस’सारखा चित्रपट करणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी याबाबत म्हटलं आहे की, ‘हिंदी चित्रपटकर्त्यांना अजून चांगले चित्रपट बनवावे लागतील. चित्रपटाचं बजेट कमी करावं लागेल. चित्रपटांच्या तिकिटांची किंमत कमी ठेवावी लागेल. ओटीटीवर कमीतकमी तीन महिन्यांनंतर चित्रपट आणावा लागेल. तसंच अहंकार सोडून इतरांच्याही गोष्टी ऐकायला हव्यात. कदाचित त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.’

निर्मात्यांचं लक्ष कथेवर
बॉलिवूडमधील या चिंताजनक परिस्थितीविषयी चित्रपट निर्माते आनंद पंडित म्हणाले, की ‘प्रत्येक व्यवसायाचा एक काळ असतो. दोन वर्षे चित्रपटगृहं बंद असल्याने प्रेक्षकांनी चित्रपट ओटीटीवर पाहिले. त्यामुळे त्यांची आवड बदलली आहे. आता त्यांना विविधांगी चित्रपट पहायचे आहेत. प्रेक्षक चित्रपटगृहात यायला तयार नाहीत, असं अजिबात नाही. ‘भुलभुलैय्या २’नं चांगला व्यवसाय करून दाखवला.’ वेगाने बदललेल्या चित्रपटसृष्टीच्या स्वरूपाबाबत आनंद म्हणाले, ‘करोनामध्ये प्रत्येकानं स्वतःला बदललं आहे. पूर्वी आपण नाश्त्यामध्ये इडली, डोसा किंवा पराठे खायचो. आता आपल्याला पिझ्झा आणि पास्ता खायची इच्छा आहे. मोठ्या पडद्याला ओटीटीनं जोरदार आव्हान दिलंय. त्यामुळे चित्रपट निर्माते आपल्या कथेवर बारकाईनं लक्ष देताहेत.’
‘धर्मवीर’ची निर्मिती एकनाथ शिंदेंच्या सल्ल्यानं नव्हे, तर शिवसेनेच्या या नेत्याची होती इच्छा
कलाकारांनी करावी मानधनात कपात
बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांनाही या अपयशाचा सामना करावा लागतोय. तेलुगू चित्रपटांच्या निर्मात्यांनी एक ऑगस्टपासून सर्व चित्रपटांचं चित्रीकरण बंद केलंय. यावर चित्रपट व्यवसाय विश्लेषक गिरीश जौहर म्हणाले, ‘तेलुगू चित्रपटांची कमाई कमी होत असल्याने निर्मात्यांचा खिसा रिकामा होतोय. पण कलाकार मात्र आपलं मानधन वाढवत चाललेत. त्यामुळे निर्मात्यांनी सर्व काही थांबवलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटकर्ते कॉर्पोरेटवाल्यांची मदत घेत नसून स्वतःहून पैसे उभे करतात. तिथे सर्व महत्त्वाचे निर्माते आणि निर्मिती संस्था आहेत. त्यामुळे तिथला चित्रपट त्यांच्या पद्धतीने बनवला जातो.’ गिरीश यांनी पुढे सांगितलं, ‘हिंदी चित्रपटांच्या अपयशामुळे उपग्रह तसंच डिजिटल कंपन्यांकडून बॉलिवूडला आता तितके पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे निर्मात्यांपासून वितरकांपर्यंत सगळेजण तोट्यात जात आहेत. यावर एक उपाय म्हणजे कलाकारांनी आपल्या मानधनात कपात करावी.’ सध्याच्या घडीला मोठ्या कलाकारांचं मानधन कोट्यवधी रुपयांमध्ये जातं. चित्रपटाला तितका प्रतिसाद न मिळाल्यास निर्मात्यांच्या खिशावर त्याचा अतिरिक्त भार पडत असल्याचं चित्र दिसतंय.

दोन-तीन चित्रपटांतून एखाद्या निर्मात्याला खूप नुकसान झालं, तर तो स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. त्यामुळे अशा वेळी कलाकारांनीही निर्मात्यांना समजून घ्यायला हवं. काही कलाकार समजून घेतातही. चित्रपटानं केलेल्या व्यवसायावरून कलाकारांचं मानधन ठरायला हवं.
-आनंद पंडित, चित्रपट निर्माते

संकलन – पार्थ डोंगरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here