मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsava) मुंबई-गोवा आणि मुंबई बंगळुरु महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. २७ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत टोलमाफी देण्यात येईल.

या वर्षी गणेश उत्सवाची सुरुवात ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे. तर अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन ९ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. गणेश उत्सवानिमित्त गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्यासाठी खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गणेशोत्सवानिमित्त २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी, म्हणून परिवहन विभागाने टोल पास जारी करावेत असे सूचीत करण्यात आले होते. त्यानुसार कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रं सादर केल्यावर त्यांना टोलमधून सूट देण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय काय?

१. २०२२ च्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक २७.०८.२०२२ ते दिनांक ११.०९.२०२२ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.म.६६) वरिल व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना / वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत आहे.

याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे “गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.

हेही वाचा : गणेश पूजनापासून ते विसर्जनापर्यंत या साहित्याची लागेल गरज, आजच घरी आणून ठेवा

२. ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेमार्फत दिले जाणारे पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उप सचिव (खा. र. १) सार्वजनिक बांधकाम विभाग, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई. ३२ यांना माहितीकरिता सादर करावी.

३. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना जाहीर प्रसिध्दी करावी. या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०८२६१३५८४०८४१८ असा आहे.

Ganeshotsava Pass

हेही वाचा : VIDEO | ‘कोसला’कारांना कधी ठेका धरताना पाहिलंय? भालचंद्र नेमाडेंचा डान्स पाहाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here