अरविंद केजरीवालांनी नवी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव ठेवला. भाजप एकाही आमदाराला फोडू शकत नाही हे दाखवण्यासाठी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडल्याचं केजरीवाल म्हणाले. भाजपचं आपरेशन लोटस दिल्लीत आपरेशन कीचड झाल्याची टीका केजरीवालांनी केली.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार विरोधी लढाईत देशातल्या जनतेची साथ हवी असल्याचं म्हटलं होतं. यावर अरविंद केजरीवालांनी सवाल उपस्थित केले आहेत. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढत असता तर तुम्हाला देशातल्या जनतेची साथ मागण्याची गरज पडली नसती. म्हणजेच देशातील जनता तुमच्या नाटकासोबत नाही, अशी टीका केजरीवालांनी केली.
मेलानिया ट्रम्प दिल्लीत फक्त शाळ्या पाहण्यासाठी आल्या, संयुक्त राष्ट्रांचे माजी सचिव बान की मून, नॉर्वेचे माजी पंतप्रधान मोहल्ला क्लिनिक पाहण्यासाठी आले. सिंगापूरमध्ये परिषदेला आम्हाला बोलावण्यात आलं. दिल्ली सरकारच्या कामावर प्रत्येक भारतीय खुश आहे मात्र, देशविरोधी लोक घाबरुन षडयंत्र करत आहेत, असा आरोप केजरीवालांनी केला.
इतका पैसा कसा आला?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपनं आतापर्यंत २७७ आमदार खरेदी केल्याचा आरोप केला. प्रत्येक आमदारासाठी २० कोटी निश्चित केले तरी २७७ आमदारांसाठी ५५०० कोटी खर्च करण्यात आले. दिल्ली साठी ठेवलेले ८०० कोटी मिळवल्यास त्यामध्ये ६३०० कोटी रुपये होतात. ६३०० कोटी रुपयांचे काळे पैसे कोठूनं आले, असा सवाल केजरीवालांनी केला. हे पैसे कोणाचे आहेत, असाही सवाल त्यांनी केला.
महागाई वाढत आहे, जीएसटी वाढत आहे, सर्व पैसे कुठं जातात, असा सवाल केजरीवालांनी केला. आपल्या अब्जाधीश मित्रांची कर्ज माफ केली जातात आणि दुसऱ्यांचे आमदार खरेदी केले जातात. या नेत्यांच्या या कामासाठी मुलांना उपाशी ठेवावं, का असा सवाल केजरीवालांनी केला.
सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या घरी १४ तास छापे टाकून काहीच मिळालं नाही. ३० ते ३५ लोक छापा टाकण्यासाठी आले होते त्यांच्या जेवणाचा खर्चपण निघाला नाही. ७ ते ८ दिवस झाल्यानंतरही छाप्यात काय मिळालं हे सांगता आलं नाही, असं केजरीवाल म्हणाले. मनीष सिसोदिया याच्या शिक्षण खात्याच्या कामाचं कौतुक करणारी बातमी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली. १३० कोटी भारतीयांशी ती अभिमानाची बातमी होती. नरेंद्र मोदींच्या भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची बातमी २५ ऑगस्टला छापून आल्याचं केजरीवाल म्हणाले.
भाजपचे एक नेते टीव्हीवर एका कार्यक्रमात ८ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हणाले. दुसऱ्या मोठ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ११०० कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हटलं. माध्यमांनी १४४ कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हटलं. नेमका खरा आकडा कोणता, असा सवाल केजरीवाल यांनी केला. सीबीआयच्या एफआयआरमध्ये १ कोटी दुसऱ्या व्यक्तीला दिले गेल्याचा आरोप आहे, असं केजरीवाल म्हणाले.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजप सिरीयल किलर प्रमाणं राज्य सरकार पाडण्यासाठी मेहनत करते. त्याऐवजी शाळा, रुग्णालयं बनवण्यावर लक्ष द्यायला हवं होतं, असं ते म्हणाले. सिसोदियांनी केजरीवालांच्या कामाचं जगात कौतुक होतंय ते यांना सहन होत नाही, असंही म्हटलं.