ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा काल स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दिघे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे शिष्य तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. तसंच दिघे यांचे दुसरे शिष्य आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनीही स्मृतिदिनानिमित्त आनंद मठ आणि शक्तिपीठ येथे उपस्थित राहून आनंद दिघेंना अभिवादन केले. यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत केलेल्या बंडखोरीमुळे ठाण्यातील शिवसेनेतही संघर्ष उभा राहिला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याची भूमिका घेतली. आनंद दिघे यांना अभिवादन करत असताना काल राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे.

शिंदे गटाकडून ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याची तयारी, भाजपच्याही पडद्यामागून हालचाली

‘धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत आहेत आणि या दैवताला नमन करण्यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले आहेत. दिघे साहेब जाऊन जरी २१ वर्ष पूर्ण झाली असली तरी ते प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. धर्मवीरांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या संस्कारामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आज आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार झाला आहे. दिघे साहेबांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले. आज ठाणे जिल्ह्यात साहेबांचे संस्कार आणि परंपरा जपण्याचं काम आम्ही करतोय. दिघे साहेब हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना या चार अक्षरांसाठी झटत होते. दिघे साहेब नेहमी बोलत असत की गद्दारांना क्षमा नाही आणि त्या विधानाला ते चिकटून राहिले होते. धर्मवीरांना टाडा लागल्यानंतर त्यांनी दोन ते अडीच वर्ष तुरुंगात काढले पण ते कोणाचे पाय धरायला गेले नाही,’ असं म्हणत राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

सरकार पडले, ते बरे झाले, अडीच वर्ष फक्त पैसे खात होते; काँग्रेसच्या कार्यकारिणीत नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

‘आम्हीच ओरिजिनल आहोत’

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना या पक्षावरच दावा सांगितल्याने आता शिवसेना नक्की कोणाची, असा प्रश्न तयार झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्यावर पलटवार करताना खासदार राजन विचारे यांनी म्हटलं आहे की, ‘दिघे साहेब हे दिघे साहेब आहेत, दिघे साहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि म्हणूनच दिघे साहेब सर्वांचं दैवत आहेत. आज या ठिकाणी माझ्यासोबत इथे आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत आणि दिघे साहेबांनी असे असंख्य कार्यकर्ते तयार करून ठेवले आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही,’ अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांना फटकारलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here