पीडितेला दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर नेऊन लग्नाच्या आशा दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत काळबांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
परभणी शहरातील विद्यानगर भागातील बी अँड सी कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेची पूर्णा तालुक्यातील ममदापूर येथील प्रशांत काळबांडे यांच्यासोबत ओळख झाली. त्यामुळे प्रशांत काळबांडे याचे घरी येणे जाणे वाढले. याच दरम्यान त्याची महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री झाली. त्यांचे १२ मार्च २०२० पासून फोनवर बोलणे सुरू होते. एप्रिल २०२० मध्ये प्रशांत काळबांडे याने पिडितेस दुचाकीवरून रामकृष्ण नगरातील मित्राच्या रूमवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर प्रशांत काळबांडे हा अल्पवयीन मुलीला वारंवार मित्राच्या रुमवर नेऊन अत्याचार करत होता. दरम्यान पिडितेवर संशय घेऊन तो भांडण करत असल्याने पिडितेने प्रशांत याच्याशी संपर्क तोडला. मात्र, तु बोलत का नाहीस असे म्हणत पिडिता व तिच्या कुटूंबास जीवे मारण्याची धमकी देत होता. २४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशांत काळबांडे व त्याच्या मित्राने पिडितेच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याची समजूत काढण्यासाठी गेलेल्या रतन चारण व त्यांच्या मुलास काठीने मारहाण केली.
तसेच पिडिता व तिच्या आईला काठीने मारून जखमी केले. या प्रकरणी पिडितेने नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रशांत काळबांडे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.