cm eknath shinde, शिंदे गटाच्या आमदारांच्या नावापुढे आता वंशपरंपरेने नवी उपाधी लागणार; शिवसेनेकडून खरपूस समाचार – shivsena saamana editorial slams the rebel mlas of the cm eknath shinde group
मुंबई : शिवसेना नेतृत्व आणि बंडखोर आमदारांच्या गटात सुरू असलेला संघर्ष दिवसागणिक अधिकच टोकदार होत चालला आहे. पावसाळी अधिवेशनात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना डिवचलं. या घोषणेनं वैतागलेल्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बॅनर झळकावून हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून शिंदे गटाचा पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला आहे.
“पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण आहे. ही सल मनात टोचत असल्यामुळेच दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहिले,” असं म्हणत सामनातून शिवसेनेनं बंडखोरांवर निशाणा साधला आहे. हेच अडाणी लोकं महाराष्ट्राचे वाटोळं करणार, रुपाली ठोंबरेंची तानाजी सावंतांवर घणाघाती टीका
‘महाराष्ट्रात खोके हराम नावाची संघटना उदयास आली’
शिवसेनेनं बंडखोर आमदारांवर टीका करताना थेट ‘बोको हराम’ या संघटनेचा उल्लेख करत शिंदे गटाला नवं नाव दिलं आहे. “महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की,” असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोका आमदारांचे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? अशा खोचक सवाल करत शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.