अमेरिका व युरोप येथील कंपन्यांना करोना काळात मोठा फटका बसल्यानंतर आता कुठे या कंपन्या नफा अनुभवत होत्या. मात्र भूराजकीय अशांततेमुळे तसेच यामुळे निर्माण होऊ घातलेल्या मंदीमुळे या कंपन्यांच्या नफ्यावर सध्या विपरित परिणाम होत आहे. याचाच परिणाम म्हणून इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्हेरिएबल पे मध्ये कपात केली आहे. काही भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन पॅकेजचा भाग म्हणून व्हेरिएबल पे देतात. हा व्हेरिएबल पे संबंधित कर्मचाऱ्याच्या तसेच संबंधित कंपनीच्या वर्षभरातील कामगिरीवरून ठरवला जातो. असे व्हेरिएबल पे कमी केल्याचे तसे संदेश या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवल्याचे रॉयटर या वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.
आगामी काळात जागतिक मंदी येणार असून त्यासाठी आपण तयारीत राहायला हवे, ही भावना सध्या उद्योगजगतामध्ये प्रबळ होत आहे. त्यामुळे कंपन्या सर्वप्रथम आपले खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे साहजिकच व्यवसायविस्तार लांबणीवर टाकला जाण्याची किंवा त्यासाठी तंत्रज्ञानविषयक खर्चाला कात्री लावली जाण्याची दाट शक्यता आहे. असे प्रकार जगभरातील कंपन्यांकडून सुरू झाले आहेत, असे निरीक्षण एव्हरेस्ट ग्रुप या अमेरिकेतील सल्लागार संस्थेचे मुख्य कार्यकारी यांनी नोंदवले आहे. एव्हरेस्ट ग्रुप ही संस्था आयटी कंपन्यांविषय़ी संशोधन करते.
भारतीय आयटी कंपन्यांनी नव्या पदवीधरांना नोकऱ्या देण्याचेही काही काळ थांबवले आहे. याद्वारे कामकाज खर्च कमी करण्याचा या कंपन्यांचा विचार आहे. या सर्व परिस्थितीवर थेट भाष्य करण्याच इन्फोसिसने टाळले असल्याचेही वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. त्याचवेळी विप्रो ने कर्मचारी कंपनी सोडून जाऊ नये म्हणून तिमाही पदोन्नती देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने १ जुलै रोजी तिमाही पदोन्नतीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. १ सप्टेंबरपासून वेतनवाढही केली जाणार आहे.
भारतीय आयटी कंपन्यांची वाटचाल
मागील दोन वर्षांपासून देशातील मोठ्या आयटी कंपन्यांनी कुशल कर्मचाऱ्यांना डॉलरमध्ये मोबदला देऊ केला आहे. क्लाऊड कम्प्युटिंग, डिजिटल पेमेंट सुविधा, सायबर सुरक्षा आणि आभासी चलन व्यवहार यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे या आयटी कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांना, त्यांनी कंपनीतच राहावे यासाठी डॉलरमध्ये मोबदला देण्याचे आमिष दाखवले गेले आहे. याचे कारण दोन वर्षांपूर्वी आयटी कंपन्यांतून कर्मचारी गळतीचे प्रमाण जितके होते, त्यापेक्षा ६० टक्के ते ८० टक्के सध्याचे प्रमाण अधिक आहे. कर्मचारी धरून ठेवण्याच्या प्रयत्नात त्याला देण्यात येणाऱ्या मोठ्या वेतन पॅकेजमुळे आयटी कंपन्यांच्या नफ्यावर ताण येऊ लागला आहे.