Authored by सरफराज सनदी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 27, 2022, 12:54 PM
Today Latest Accident News : पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. रस्त्यावर काम सुरू असल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे.

हायलाइट्स:
- वारकऱ्यांच्या ट्रकचा भीषण अपघात
- ट्रक पलटी होऊन तब्बल ३० वारकरी जखमी
- रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघात
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी येथील सुमारे ५० वारकरी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी शुक्रवारी निघाले होते. एका ट्रकमधून जाणाऱ्या या वारकऱ्यांच्या गाडीचा कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विठ्ठलवाडी येथील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघात झाला आहे. भरधाव असणाऱ्या ट्रक चालकाला महामार्गावर काही ठिकाणी काम चालू असल्याने पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव ट्रक समोर असणाऱ्या एसटीला जाऊन धडकला.
त्यानंतर चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने रस्त्यातल्या खड्ड्यातून ट्रक पलटी झाली. यामध्ये सुमारे ३० वारकरी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य करत रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.