सोलापूर: आयकर विभागाने सोलापुरातील सात ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. २५ ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून कारवाई व तपास सुरू आहे. डॉ गुरुनाथ परळे यांचं स्पंदन हॉस्पिटल व घर, डॉ अनुपम शहा यांचे घर व हॉस्पिटल, बिपिन पटेल, मेहुल पटेल यांच्याशी निगडित असलेले अश्विनी हॉस्पिटल, अश्विनी मेडिकल कॉलेज, मेहुल कन्स्ट्रक्शन, पंढरपूर येथील अभिजित पाटील यांचे साखर कारखाने, कार्यालय व घर या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून आहेत. प्रत्येक बाबीचा सखोल तपास केला जात आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या बँकेचे सर्व अकाऊंट तपासले जात आहेत. आयकर अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास मनाई केली.
हृदयरोग तज्ञ डॉ अनुपम शहा, डॉ गुरुनाथ परळे, बिपीन पटेल, मेहुल पटेल यांच्या राहत्या घरासमोर व कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त आहे. आयकर विभागाचे अधिकारी बाहेर येतात आणि आपल्या वाहनांतून कागदपत्रे घेऊन जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डॉक्टरांशी संपर्क केले असता ते देखील महिती द्यावयास तयार नाहीत.
प्राथमिक माहितीनुसार बॅंक अकाऊंट सील
डॉ गुरुनाथ परळे, डॉ अनुपम शहा, बिपीन पटेल, मेहुल पटेल यांची बँक खाती आयकर अधिकाऱ्यांनी सील केली आहेत. डॉ गुरुनाथ परळे हे कॉन्फरन्ससाठी पुद्दुचेरीला गेले होते. आयकर विभागाने त्यांना बोलावून घेतले आहे आणि आयसीआयसीआय बॅंकेतील त्यांच्या खात्याची कसून तपासणी केली आहे. तर पंढरपूर येथील साखर कारखानदार अभिजीत पाटील यांनादेखील आयकर विभागाने बोलावून घेतले आहेत.