या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी दोन ट्विटस केली आहेत. यापैकी पहिल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी ‘विद्याताई चव्हाणजी को जय श्रीराम’ असे म्हटले आहे. तासाभरातच कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले. यामध्ये कंबोज यांनी विद्या चव्हाण यांचा उल्लेख केला नसला तरी इशाऱ्याचा रोख विद्या चव्हाण यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा आहे. या ट्विटमध्ये कंबोज यांनी म्हटले आहे की, लगाम दिसत नसला तरी तोंडावर तो असला पाहिजे. विनाकारण आमच्याशी वाद उकरून काढलात तर मग तयार राहा. हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक वक्तव्य मोहित कंबोज यांनी केले आहे. त्यामुळे आता मोहित कंबोज आगामी काळात कोणता खळबळजनक खुलासा किंवा कोणते सनसनाटी प्रकरण उकरून काढणार, हे पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वीच मोहित कंबोज यांनी दोन ट्विटस करून सिंचन घोटाळा आणि बारामती एग्रो लिमिटेड, ग्रीन एकर कंपनीची चौकशी होणार असल्याचे म्हटले होते. यापैकी सिंचन घोटाळ्याचा संबंध अजित पवार आणि बारामती एग्रो लिमिटेडचा संबंध रोहित पवार यांच्याशी जोडला जात आहे. त्यानंतर आता मोहित कंबोज हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहेत.
विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या?
बिल्कीस बानो (bilkis bano) ही मुस्लिम असली तरी ती आमची बहीण आहे. प्रत्येक स्त्रीचा धर्म हे तिचा चारित्र्य आहे. त्यावर जर कोणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणीही असो. कोणालाही हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. या प्रकरणातील ११ जणांना सोडून देण्यात आलंय, नुसतंच सोडलं नाही तर त्यांना हार घालत मिठाई भरवण्यात आली. प्रत्येक स्रीचा धर्म हे तिचं चारित्र्य आहे. त्यावर जर कुणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणाला हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आम्ही विरोध करू, असे विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी म्हटले होते. (bilkis bano case)