मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांचे छायाचित्र प्रोफाइलवर ठेवून त्या आधारे समाजमाध्यमांवरून ‘ॲमेझॉन गिफ्ट’चे संदेश पाठविले जात आहेत. ही सायबर फसवणूक असून कुणीही यावर प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले. या आधीदेखील अशाच प्रकारे बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या नावांचा, छायाचित्रांचा वापर करून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

मुंबई पोलिस दलातील काहींना शुक्रवारी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांचे गणवेशातील छायाचित्र प्रोफाइलवर ठेवलेल्या क्रमांकावरून संदेश आले. यामध्ये ‘ॲमेझॉन पे ई-गिफ्ट विथ १००००’ असे नमूद करून त्यामध्ये पाठविण्यात आलेल्या लिंकवर लवकरात लवकर जाऊन भेटवस्तू मिळवा, असे म्हटले होते. ज्यांना संदेश गेले त्यांनी याबाबतची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयात दिली. पोलिस आयुक्तांनी अशा प्रकारचे कोणतेही संदेश पाठविले नसल्याने कुणीतरी फसवणूक करण्यासाठी हे सर्व करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस दिशाभूल करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. या संदेशावर कुणीही प्रतिसाद देऊ नये आणि अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेत तीन मोठे बदल, शेवटपर्यंत साथ देणाऱ्या ‘मावळ्यांच्या’ निष्ठेचं सोनं झालं

या आधीच्या घटना

– प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त गीता रवीचंद्रन यांच्या नावाने त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मोफत भेटवस्तूचे संदेश पाठविण्यात आले होते.

– एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांचा मोबाइल क्रमांक सायबर चोरांनी हॅक करून व्हॉट्सॲपद्वारे भेटवस्तूचे संदेश पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here