पक्षांतर करणे लोकांना आवडत नाही, त्यातच काही ‘आमिष’ घेऊन गेले असतील तर जनतेला ते अजिबात पसंत पडत नाही, त्याविरुद्ध जनतेत चीड निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेतून पक्षांतर करून काही आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी पक्षांतर कशासाठी केले आहे, त्याचीही सुरु चर्चा आहे. हाच मुद्दा धरुन बंडखोर आमदारांविरोधात रान उठवा. जनतेच्या मनात पक्षांतराबद्दल जागृती निर्माण करा. यामुळे जनतेत त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण होईल व जनता त्यांना स्वीकारणार नाही. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
‘५० खोके, एकदम ओके’चा ‘टी शर्ट’द्वारे प्रचाराचा निर्णय
प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात पक्षाची आढावा बैठक झाली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. राज्याच्या राजकारणात ‘५० खोके, एकदम ओके’ या सत्ताधाऱ्यांविरोधातील महाविकास आघाडीच्या घोषणेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता याच घोषणेचे ‘टी शर्ट’ वाटून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून प्रचार करण्यात येणार आहे.
‘…तर उद्धव ठाकरे म्हणतील, ही आमची सीट, आम्हाला जागा द्या’
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक तालुक्यात सभासद संख्या अधिक करावी लागणार आहे, जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सभासद संख्या अधिक असली, तर आपल्याला त्याठिकाणची जागा मागता येणार नाही, यासाठी राष्ट्रवादीची ताकद दाखवावी लागेल, याची जाणीव जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली.