नेमकं प्रकरण काय?
अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दौऱ्याचा तपशील पाहून अनेकांना हसू फुटले होते. दौऱ्याच्या कार्यक्रमात नमूद केल्याप्रमाणे तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहोचणार होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहतील. तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यालयात जातील. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यालयात जातील. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जातील, असा एकंदरीत चमत्कारिक दौरा पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशा दौऱ्याने तानाजी सावंत यांची चांगलीच नाचक्की झाली होती.
तानाजी सावंतांचे स्पष्टीकरण
सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जाऊ लागल्यानंतर तानाजी सावंत यांनी आपल्या दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. दि. २७, २८ रोजी माझा वेळ पुणे येथील कार्यालयांमध्ये राखीव ठेवलेला असल्याकारणाने प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल निरनिराळी चर्चा पाहायला मिळाली.बालाजी नगर व कात्रज येथील कार्यालयातूनच आजवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्यात आला, याच कार्यालयातून पूरग्रस्तांसाठी भरभरून मदत पाठवण्यात आले. याच १०×१० च्या खोलीतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीचं रोपटं लावण्यात आलं. आज त्याचं रूपांतर वटवृक्षात होतं आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते.
याच कार्यालयातून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला गेला, सोमनाथ नाईक च्या उपचारासाठी मदत झाली, याच कार्यालयातून स्व. दिलीप जावळे यांच्या कुटुंबाला मदत झाली, कोविड काळामध्ये देखील एकही दिवस घरामध्ये न बसता रोज नागरिकांसाठी मदत पोहचवली मग त्या मध्ये औषध इंजेक्शनपासून ते ऑक्सिजन सिलेंडरपर्यंत मदत देऊ केली. अशी कित्येक कामे या कार्यालयातून झाली आहेत, असा सर्व तपशील जाहीर करत तानाजी सावंत यांनी घर ते कार्यालय हा आपला दौरा किती महत्त्वाचा होता, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.