अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नेते विखे आणि थोरात यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. शिर्डी आणि संगमनेर हे दोघांचेही मतदारसंघ शेजारीच असल्याने एकमेकांविरोधात कुरघोड्या करण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. मविआ सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेले महसूलमंत्रीपद शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याने अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. रविवारी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात आजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत भव्य नागरी सत्कार केला.
यावेळी भाषणादरम्यान विखे पाटलांनी नाव न घेता थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतक्या दिवस पारतंत्र्यात होतो. आत स्वतंत्र झाल्याची भावना मला या तालुक्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आज दिसली. संगमनेर तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सामान्य माणसाच्या घरात बंदूका घेवून जाण्याची मुजोरी वाढली आहे. परंतू आता या वाळू माफियांचा माजही उतरावा लागेल. यासाठी सरकार महिन्याभरात वाळूच्या अनुषंगाने सर्वकंष धोरण आणणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. अधिकाऱ्यांनी सुध्दा कोणाच्या कार्यालयातून आलेल्या फोनवर काम करणं बंद करा. सरकार आता बदलले आहे याची जाणीव ठेवा. लवकरच तालुक्यातील प्रश्नासाठी आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विखे पाटलांचे भाषण सुरू असतानाच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘इथला आमदार पहिले बदला’ अशी मागणी केली. त्यावर विखे पाटलांनी संगमनेर तालुक्यात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, गावागावात, घराघरापर्यंत जावून मोदींजींच्या योजना लोकांपर्यंत पोहचावा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला तर विधानसभेला सुद्धा संगमनेर मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवू, असे सूचक विधान केले. विखे पाटलांच्या या विधानाने अहमदनगर जिल्ह्यात विखे-थोरातांच्या राजकीय संघर्षाला आणखी धार येणार आहे.