भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच गुलाबराव पाटील व भाजपचे मंत्री गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले की, मोदींनी मला सांगितलं की गुलाब महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज, त्या पद्धतीने मी राज्यात काम करतो आहे. त्यामुळे माझ्यावर टीका सुद्धा झाली.
‘आपल काम म्हणजे…मुंजोबा, पिरोबा सारखी भूमिका’
लोकांनी निवडून दिलेले पद हे आमदाराचे पद असते, त्यामुळे पक्षीय मतभेद असले तरी लोकांनी ते सर्वमान्य केलेले असल्यामुळे काम करण्याची जबाबदारी असते व तेच मी करतोय. आमचं ७५ टक्के आयुष्य हे विरोधात गेलय. मात्र मुंजोबा, पिरोबा सारखी भूमिका देवानं आपल्याला दिलीय. देवाकडे जातात त्या पद्धतीने लोक आपल्याकडेही येतात. हे भाग्य आपल्याला लाभले असल्याचेही यावेळी मंत्र पाटील म्हणाले.
आपल्या दारी येणाऱ्या प्रत्येकाचं काम करण्याचे भाग्य आपल्याला देवाने दिले असल्यामुळे आपण लोकशाहीतले देव असल्याचेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
‘मोठ्याप्रमाणावर निधी देवूनही कामे होत नाही, लोक आम्हाला खड्डे दाखवतात’
मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून दिल्यानंतरही काम होत नाहीये. जेव्हा जळगाव शहरातून जातो आणि खड्ड्यात गाडी जाते तेव्हा लोक आमच्याकडे बोट दाखवून म्हणतात, पाहा हे खड्डे पहा, अशी शोकांतिका खुद्द जळगाव जिल्ह्यातील मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. लोकांकडून टॅक्स घेतात, मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून देऊनही कामे केली जात नाहीत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव महापालिकेच्या कारभारावर टीका केल्याचा पहायला मिळालं. तसेच लोक जेव्हा जळगाव शहरातल्या खड्डय्याबद्दल बोलून दाखवतात तेव्हा आम्हाला आमची लाज वाटते अशी खंत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.