India vs Pakistan Asia Cup 2022: २०१८ मध्ये झालेल्या दुखापतीनंतर हार्दिकच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र त्यानं हार मानली नाही. दुखापतींमधून बाहेर पडत त्यानं संघात पुनरागमन केलं. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा आशिया कपमध्ये त्याच मैदानात त्याच प्रतिस्पर्ध्याविरोधात हार्दिकनं संस्मरणीय खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.

भेदक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजीला ब्रेक लावल्यानंतर हार्दिकनं फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. संघ अडचणीत असताना हार्दिकनं रविंद्र जाडेजासोबत भागिदारी रचली. याच भागिदारीनं सामना भारताच्या बाजूनं फिरवला. हार्दिकनंच शेवटच्या षटकात षटकार ठोकत अटीतटीच्या लढतीत संघाला विजय मिळवून दिला. १७ चेंडूंमध्ये हार्दिकनं नाबाद ३३ धावा केल्या. त्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
दुखापतींवर मात करत पुनरागमन केल्यानंतर हार्दिकची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. सुरुवातीला त्याला गोलंदाजी करता येत नव्हती. तो केवळ फलंदाजी करायचा. मात्र त्यानं स्वत:च्या फिटनेसवर सातत्यानं मेहनत घेतली. टी-२० सामन्यात चार षटकांचा स्पेल पूर्ण करण्याइतका फिटनेस त्यानं पुन्हा कमावला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.