पती आणि सासरे घरात नसताना दोन अज्ञात व्यक्ती आपल्या घरात शिरल्या. त्यांनी आपले हात बांधले आणि चाकूच्या धाकानं बलात्कार केल्याची तक्रार महिलेनं नोंदवली होती. ही महिला धारावीतील चाळीत राहते. दोघांनी बलात्कार करताना व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा दावाही तिनं केला होता.
महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. १६ मे रोजी पोलिसांनी प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला. त्यांनी दोन भावंडांना अटक केली होती. या मुलांचे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपली मुलं निष्पाप असल्याचा दावा केला.
दोन भावंडं धारावीतील चाळीत गेल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. आरोप करणाऱ्या महिलेनं त्यांची ओळख पटवल्यानं त्यांना अटक करण्यात आली. मात्र या मुलांनी गुन्हा केला नसल्याचं तपासातून समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासली. १७ ते १८ जणांची चौकशी केली. महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास बंद करणार आहेत.