सिंधुदुर्ग :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली असून सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऐतिहासिक राजकीय संकटातून जात आहेत. लोकप्रतिनिधींसह संघटनेतीलही अनेक शिलेदार साथ सोडत असल्याने उद्धव यांच्या आगामी वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र पक्षात असं बंडाचं वादळ निर्माण झालेलं असतानाही गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव हे ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. जाधव यांना या पक्षनिष्ठेचं फळ देत नुकतीच उद्धव ठाकरे यांनी त्यांची नेतेपदी निवड केली. मात्र याच भास्कर जाधवांविषयी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘भास्कर जाधव यांचं ठाकरे प्रेम सध्या वाहू लागलंय. मात्र गुवाहाटीचं तिकीट जाधवांना पण हवं होतं,’ असा दावा निलेश राणे यांनी केला आहे. तसंच जाधव यांना हे तिकीट का मिळालं नाही, हे आम्हाला चांगलं माहीत आहे, त्यामुळे तुम्ही जास्त उडू नका,’ असा इशारा राणे यांनी दिला आहे.

भास्कर जाधव आणि शिवसेना

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर जाधव यांना महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाचे वेध लागले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आश्चर्याचा धक्का देत भास्कर जाधव यांना मंत्रिपद देणं टाळलं. त्यानंतर जाधव यांनी याबाबतची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. मात्र या नाराजीनंतरही भास्कर जाधव हे निष्ठेने शिवसेनेची खिंड लढवत राहिले. सभागृहात आणि जाहीर भाषणांमधूनही ते भाजपचा आक्रमक समाचार घेत आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची मोठी घोषणा; महाराष्ट्र पिंजून काढत सरकारविरोधात रान पेटवणार

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट स्थापन करून उद्धव ठाकरेंपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही भास्कर जाधव हे मात्र ‘मातोश्री’सोबत राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नुकतीच त्यांची शिवसेना नेतेपदी निवड केली आहे. अशातच भास्कर जाधव यांनीही बंडासाठी प्रयत्न केल्याचा दावा निलेश राणे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत आमदार जाधव हे काय खुलासा करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here