ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय बाब असून अशा जातीयवादी मानसिकतेच्या लोकांवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करत आज मेहेरगाव येथील गावातील दलित समाजबांधवांनी आणि काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पीडितांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे मांडली.
यासंदर्भात जिल्हाप्रशासनाला आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लेखी निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ‘मेहेरगाव येथे बैल पोळ्यानिमित्त दलित तरुणांनी काढलेली मिरवणूक काही जातीयवादी लोकांनी अडविली. तसेच जबर मारहाण करत लाठीकाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. परंतु, अद्याप एकालाही अटक केलेली नाही. सवर्ण समाजाने गावात बैठक घेवून व पोलिस प्रशासनावर दबाव टाकून बौध्द समाजाच्या तरुणांवर ३९५ सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला.’
तसेच इतक्यावर न थांबता गावातील जातीयवादी लोकांनी गावातील सर्वच दलित वसतीवर बहिष्कार टाकला आहे. दलितांना किराणा देऊ नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, न्हाव्याने दलित लोकांची दाढी, कटींग करु नये, जो दुकानदार किराणा देईल त्याला गावात बोलावून चौकात ठोकायचे आणि त्याच्याकडून एक ते पन्नास हजार रुपये दंड आकारावा, असा निर्णय गावातील सवर्ण लोकांनी घेतला आहे.
ही निंदनीय बाब असून धुळे तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी देखील शिक्षण घेणाऱ्या दलित तरुणांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम केले आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करुन न्याय द्यावा, अशी मागणी मेहेरगांव येथील ग्रामस्थांनी यावेळी केली आहे.