मुंबई: सळसळतं रक्त आणि डोळ्यात बदल्याची आग घेऊन काहीही करुन जिंकण्याचा निर्धार करत भारत आणि पाकिस्तान संघाचे खेळाडू दुबईच्या मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले. २०२१ च्या टी ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघाचे खेळाडू मैदानावर उतरले होते. झालंही तसंच…. भारताने पराभवाचा वचपा तर काढला पण त्याचबरोबर आशिया कप विजेतेपदाचा भारत प्रबळ दावेदार असल्याचं ठणकावून सांगितलं. सामन्याच्या निकालानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं विजयी सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरलं होतं. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांच्याकडे एवढी उर्जा येते कुठून? असा प्रश्न व्हिडीओ पाहून हजारो लोकांना पडला होता. तोच प्रश्न त्यांचे नातू रोहित पवार यांनाही पडलाय…

व्हिडीओ पाहून काय म्हणालेत रोहित पवार..?

हा व्हिडिओ पाहून तर मी अवाकच झालो. काल सकाळी द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन आणि आणखी एका कार्यक्रमासाठी साहेब मुंबईवरून पुण्याला आले. कार्यक्रमानंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या व सायंकाळी ७-८ च्या सुमारास पुन्हा पुण्याहून निघून रात्री उशिरा मुंबईला पोचले. त्यानंतरही त्यांनी भारत-पाकिस्तान संपूर्ण मॅच पाहिली आणि आपला भारतीय संघ विजयी झाल्यानंतर आपण जसे मनापासून आनंद व्यक्त करतो तसा दोन्ही हात उंचावून उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला.

आज सकाळपासून पवारसाहेब परत ठाणे दौऱ्यावर आहेत. साहेबांचं हे काम गेली ६० वर्ष असंच अविरत काम सुरू आहे. त्यामुळे तुमच्यासारखाच मलाही प्रश्न पडतो की, साहेबांमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? कदाचित यामुळेच ते माझ्यासारख्या लाखो तरुणांचे ‘आयडॉल’ आहेत, असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड यांनाही तोच प्रश्न

सकाळी मुंबईवरून पुणे… ३ तास द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन… ५ ते ७ फ.मु. शिंदेंचा कार्यक्रम… ७ ला पुण्यातून निघून मुंबई… १२ वाजेपर्यंत मॅच बघून भारत विजयी झाल्यानंतरचा हा आनंदोत्सव…. कुठून येत असेल इतकी उर्जा… या 82 वर्षाच्या तरूणाकडे काय माहिती…., असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, शरद पवारांच्या आनंद पोटात माईना, खास सेलिब्रेशन, Video पाहाच
शरद पवारांचं चर्चेतील सेलिब्रेशन!

शरद पवार यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघादरम्यान झालेल्या सामन्याचा आनंद घेतला. अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी सामन्याचा आनंद लुटला. त्यांच्या साथीला मॅच पाहायला त्यांच्या नातवांची हजेरी होती. खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय आणि सुप्रिया यांच्या कन्या रेवती यांनी आपल्या आजोबांशेजारी बसून सामन्याचा आनंद लुटला. जेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला तेव्हा शरद पवार यांनी नातवांच्या साथीने अनोख्या शैलीत विजयाचं सेलिब्रेशन केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ ट्विट केला. आपले दोन्ही हात उंचावून भारतीय संघाला शुभेच्छा देत पवारांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here