गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील अल्पभूधारक शेतकरी बळीराम कोलते जंगलातील कच्च्या रस्त्याने जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून बळी घेतला. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास शंकरनगर नाल्याजवळ घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाविरोधात रोष निर्माण झाला. आतापर्यंत नरभक्षक वाघाने आरमोरी, अरसोडा व लगतच्या परिसरात ११ जणांच्या नरडीचा घोट घेतला असतानाही वाघाचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बळीराम कोलते यांचा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देणार नाही, अशी आंदोलनात्मक भूमिका घेत जंगलातच ठिय्या मांडला.

वाघाच्या हल्ल्यात अल्पभूधारक शेतकरी ठार झाल्याची घटना माहिती होताच जोगीसाखरा गटग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ठाकूर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम, अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियनचे अमोल मारकवार तातडीने घटनास्थळी पोहोचले. वाघाच्या हल्ल्याची माहिती होऊनही बराच वेळ वनविभागाचे अधिकारी उपस्थित झाले नाही. त्यामुळे घटनास्थळीच ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत अधिकारी येऊन मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वातावरण चिघळले.

भारताने पाकिस्तानवर फक्त विजय नाही मिळवला तर…; दुबईच्या मैदानावर झालेत मोठे विक्रम
त्यामुळे आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी जागेवर ५० हजार रुपये देण्यात यावे. सानुग्रह अनुदानात वाढ करावी. शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी संरक्षण द्यावे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. देसाईगंजचे साहायक उपवनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी मागण्या मान्य केल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वनविभागाच्या ताब्यात दिला. घटनेचा अधिक तपास साहायक उपवनसंरक्षक मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, उपक्षेत्र साहाय्यक गाजी शेख, उपक्षेत्र साहाय्यक राजू कुंभारे, वनरक्षक करकाडे, गेडाम करीत आहेत.

अन्यथा तीव्र आंदोलन करू

वाघाने बळी घेतलेल्या जंगलालगत शंकरनगर, जोगीसाखरा, सालमारा परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. वाघाने बळी घेतल्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तत्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोगीसाखरा गटग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ठाकूर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात परिसरातील जनतेनी दिला आहे.
‘५० खोके, एकदम ओके’: गुलाबराव पाटलांकडून महाविकास आघाडीच्या हातात आयतं कोलीत? VIDEO व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here