‘लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत मानाची पाच गणेश मंडळे मार्गस्थ झाल्यानंतरच इतर मंडळांनी जावे, हा रुढी-परंपरा आणि प्रथेचा भाग असून, तसा कायदा नाही. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी लहान गणेश मंडळांच्या लक्ष्मी रस्त्याच्या वापरावरील बंधने बेकायदा आहेत. त्यामुळे राज्यघटनेतील कलम १९ नुसार मिळालेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन होत आहे,’ असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पुणे पोलिस आयुक्तांसह श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ आणि केसरीवाडा गणपती मंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. असीम सरोदे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. तृणाल टोणपे आणि अॅड. अक्षय देसाई यांनी दिली.
लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकांमध्ये पोलिसांकडून मानाच्या मंडळांनाच प्राधान्य देते. याबाबत दरवर्षी विनंती करूनही पोलिस ऐकून घेत नाहीत. मानाच्या पाच गणेश मंडळांकडून अन्य मंडळांना तुच्छतेची वागणूक दिली जाते, असे याचिकेत म्हटले आहे.
लेखी कायदा, नियम नाहीच
लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाच गणेश मंडळांना अगोदर मिरवणूक काढण्याचा अधिकार कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार देण्यात आला आहे, अशी विचारणा माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी माहितीच्या अधिकारात पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यावर याबाबत कोणताही लेखी कायदा किंवा नियम नाही, असे त्यांना कळविण्यात आले होते. त्याचाही उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांच्या मागण्या
– लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या गणेश मंडळांपूर्वी ज्या मंडळांना विसर्जन मिरवणूक काढायची असल्यास पोलिस आयुक्तांनी परवानगी द्यावी.
– मानाच्या गणेश मंडळांनी किती वेळात विसर्जन मिरवणूक पूर्ण करावी, याबाबत स्पष्ट वेळमर्यादा घालून द्यावी.
– लक्ष्मी रस्त्यावर सर्वप्रथम येणाऱ्या गणेश मंडळाला विसर्जन मिरवणूक काढण्याची संमती मानाच्याा पाच गणेश मंडळांनी द्यावी.
– भेदभाव आणि विषमता जोपासणाऱ्या या रुढी-परंपरा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत.
– कोणत्याही विसर्जन मिरवणुकांमध्ये कधीच विषमता असू नये.
– सर्व गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात.