आजपासून ट्रायल रन सुरू

एमएमआरसीएलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा वेग, आपत्कालीन ब्रेक यासह विविध निकषांच्या आधारे या मेट्रो ३ ची चाचणी केली जाईल. १००० किमी ट्रायल रन सहा महिन्यांच्या कालावधीत आयोजित केला जाईल. या चाचण्या अर्थात ट्रायल रन तात्पुरत्या सुविधा क्षेत्रापासून सुरू होणाऱ्या बोगद्यांमध्ये घेतल्या जातील. ही चाचणी तीन ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालेल. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी MMRCL ला ९ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे.
मेट्रोसाठी किती खर्च येणार?

३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग दक्षिण मुंबई आणि त्यांच्या उपनगरांना जोडेल आणि दोन टप्प्यांत मार्ग सुरू केला जाईल. MMRCL सिप्झ आणि बीकेसी दरम्यानच्या कॉरिडॉरचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत आणि बीकेसी आणि कुलाबादरम्यानचा दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. मेट्रो ३ मार्गाचं काम २०२१ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्यावेळी हा खर्च २३,१३६ कोटी रुपये इतका होता. परंतु काही कारणांनी हे काम रखडलं गेलं होतं. त्यामुळे आता हा खर्च २३,१३६ कोटी रुपयांवरुन ३७,२७५ कोटी रुपये इतका झाला आहे.
कोणते स्टेशन्स असणार?

३३. ५ किलोमीटर लांबीच्या या मुंबई मेट्रोला २७ स्टेशन्स असणार आहेत. २०१६ रोजी सुरू झालेला हा प्रोजेक्ट २०२५ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. ९८.८ टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. तसंच सिव्हिल वर्क ८४ टक्के पूर्ण झालं आहे, तर ओव्हरऑल ७३ टक्के प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एयरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एयरपोर्ट, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ, आरे डेपो अशी स्टेशन्स असणार आहेत. या मेट्रोचा वेग ८५ ते ९५ किमी ताशी असेल. सुरुवातीला सारीपूतनगर ते मरोळ नाका मार्गावर चाचणी होत असून तांत्रिक सुधारणांसाठी ही चाचणी घेण्यात येत आहे.
काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये?

मेट्रो ३ संपूर्ण एसी असण्यासह स्वयंचलित असणार आहे. तसंच मेट्रोमध्ये प्रत्येक डब्ब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन, धूर, अग्निशोधक यंत्रणा, आर्द्रता नियंत्रण यंत्रणाही आहे. जाहिराती तसंच प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी लावण्यात आले आहेत. संपूर्ण मेट्रो मार्गाचा डिजिटल नकाशाही इथे देण्यात आला आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअर ठेवण्यासाठीही खास सोय यात आहे. मेट्रोमध्ये बसण्यसाठी चांगली बैठक व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि मेट्रो नियंत्रक यांच्या संवादासाठी ध्वनीयंत्रणा देण्यात आली आहे.
मेट्रो ३ कारशेड

मेट्रो ३ कारशेडचा प्रस्ताव सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारच्या काळात आरे कॉलनीत ठेवण्यात आला होता. याला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा विरोध होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यानंतर कारशेडची योजना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गला हलवण्याची घोषणा केली होती. २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मेट्रो ३ कारशेडचं ((Aarey Metro 3 Car Shed)) काम पुन्हा आरेमध्ये आणण्यात आलं.