वैशाली बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्या मृतावस्थेत सापडल्या. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. वैशाली यांची हत्या गळ्या दाबून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
वैशाली बलसारा या वलसाडमधील प्रसिद्ध गायिका होत्या. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सूरतला पाठवला. वैशाली यांच्या माहेरच्या व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस वैशाली यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या मित्र परिवारातील सर्वांचीही चौकशी करत आहेत.
वैशाली यांचं घर ते त्यांचा मृतदेह आढळून आलेलं ठिकाण या दरम्यान असलेल्या सर्व सीसीटीव्हींमधील फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत. पोलिसांना हत्येचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आठ पथकं तयार करण्यात आली आहेत. वैशाली यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी हितेश यांच्याशी झाला. दोघांना एक मुलगी आहे. हितेश बलसारा यांना पहिल्या पत्नीपासूनही एक मुलगी आहे. हितेश आणि वैशाली त्यांच्या दोन मुलींसह आई-वडिलांसोबत राहायचे.