इटावा: उत्तर प्रदेशच्या इटावामधील एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. रेल्वे फाटक ओलांडताना एक दुचाकीस्वार थोडक्यात वाचला. मात्र त्याच्या दुचाकीचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. झारखंड स्वर्ण जयंती एक्स्प्रेस हटियाहून बिहारला जात असताना हा प्रकार घडला. ही घटना २६ ऑगस्टची आहे. घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

रामनगर रेल्वे फाटक परिसरात ही घटना घडली. दुचाकीस्वार स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुचाकी रेल्वे रुळांवर टाकून पळाला. त्यानंतर पुढच्या काही सेकंदांमध्ये तिथून झारखंड जयंती एक्स्प्रेस ११० किलोमीटर प्रतितास वेगानं धावली. दुचाकीस्वारानं दुचाकी सोडून पळ काढला नसता, तर ट्रेननं त्यालाही धडक दिली असती. मात्र सुदैवानं तो सुखरुप बचावला.

अनेक जण रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी दूरवरून एक्स्प्रेस येताना दिसली. ती पाहून सगळेच मागे हटले. यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्या पुढे गेला. एक्स्प्रेस येत असल्याचं पाहताच त्यानं यू टर्न मारला. मात्र त्याचवेळी त्याची दुचाकी खाली पडली. त्यानं दुचाकी उभी करण्याचा, ती खेचून रुळांवरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुचाकी रुळांवरून हटवता आली नाही.
तुला बाईकनं सोडतो! जिजूंनी लिफ्ट दिली, मेहुणी घरी परतलीच नाही; सिंधुदुर्गात निर्घृण हत्या
एक्स्प्रेस अतिशय जवळ आल्याचं पाहून त्यानं दुचाकी तिथेच टाकली आणि तिथून धावत सुटला. त्यानंतर पुढच्या काही क्षणांमध्ये एक्स्प्रेस ११० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं तिथून धावली. एक्स्प्रेसची धडक बसल्यानं दुचाकीचे अक्षरश: तुकडे झाले. बाईकला धडक दिल्यानंतर एक्स्प्रेसच्या चालकानं एमर्जन्सी ब्रेक दाबला. त्यानं घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आरपीएफ आणि तांत्रिक पथक तिथे पोहोचलं. त्यांनी ट्रेनच्या इंजिनमध्ये अडकलेले दुचाकीचे तुकडे काढले. त्यानंतर एक्स्प्रेस रवाना झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here