पुणे : महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार प्रगती बाणखेले यांच्या ‘ऑन द फील्ड’ या राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्वलंत प्रश्नांचा धांडोळा घेणाऱ्या ग्रंथाला सन २०२१ या वर्षाचा गणेश सरस्वती ठाकूरदेसाई स्मृती पोरितोषिक जाहीर झाला आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून हे पुरस्कार देण्यात येतो. पुढील महिन्यात १२ सप्टेंबर रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. (marathi sahitya parishad prize for the book on the field by journalist pragati bankhele)
‘११६ वर्षे जुन्या महाराष्ट्रामधील आद्य साहित्य संस्थेकडून हा सन्मान मिळणे, ही आनंदाची बाब आहे. माणूस केंद्रस्थानी ठेवून पत्रकारिता करताना आपण जे लिहितो, ते साहित्य म्हणून सन्मानित व्हावे, हे पुढील पत्रकारिता आणि लिखाणाला बळ देणारे आहे’, अशी प्रतिक्रिया पत्रकार, लेखिका प्रगती बाणखेले यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना व्यक्त केली आहे.
पत्रकार प्रगती बाणखेले यांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध विषयांवर संवेदनशीलतेने लिहिलेले, जीवनाच्या विविध अंगांना आणि समस्यांना स्पर्श करणारे लेख वाचकांना ‘ऑन द फील्ड’ या पुस्तकात वाचायला मिळाले आहेत. या पुस्तकात प्रामुख्याने तत्कालीन ज्वलंत विषयांवर लिहिलेले लेख आहेत. त्यांपैकी ‘निळा दर्या लाल रेघ’ यांसारखे लेख आवर्जून उल्लेख करावेत असेच. यात भारतातून पाकिस्ताच्या हद्दीत गेलेल्या मच्छिमारांवर गुदरलेले प्रसंग आणि त्याद्वारे भारत आणि पाकिस्तान संबंधांवरही प्रकाश पडतो.
भगतसिंगांचं हौतात्मस्थळ असलेलं ऐतिहासिक लाहोर शहर आपल्याला, ‘मैने लाहोर देख्या’मध्ये दिसतं, तर ‘आँखों को विसा नहीं लगता’, हा गुप्तहेर म्हणून तुरुंगात शिक्षा भोगणारे हमीद अन्सारी यांची कथा सांगणार लेख, यादवी युद्धानंतरची श्रींलका, ‘तिसऱ्या जगात’ हा तृतीयपंथीयांचे जग उलगडणारा लेख, ‘हरयाणा बदल देंगे’ हा लिंगनिवडीसंदर्भातील लेख, ‘बालाघाटातील बालवधू’, ‘पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरो’ हे बालविवाहाशी संबंधित लेख, ‘शिक्षणाच्या हक्कावर अर्धा कोयता’ हा उसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्येवरील लेख, तसेच ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही अशा माणसांचे जगणे दाखवणारा ‘भटके विमुक्त’ हा लेख, शिवाय महिलांना ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर खरेच स्त्रियांना ५० टक्क्यांचा वाटा मिळाला आहे का याचा शोध घेणारा ‘गावकारभारणी’ हा लेख या ग्रंथात वाचायला मिळतात.
सन २०२१ या वर्षातील विविध साहित्यप्रकारांतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींना सोमवार दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यातील एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे असणार आहेत.