येवला : तालुक्यातील भाटगाव शिवारातील भाटगाव-रायते दरम्यान अगस्ती नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. दीपक दिलीप मिटके (वय १८, रा. भाटगाव, ता. येवला) आणि तुषार देवीदास उगले (वय १८, रा. मांडवड, ता. नांदगाव) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना येवला तालुक्यात मात्र या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
दीपक मिटके हा १२वी अनुत्तीर्ण होता, तर त्याचा आतेभाऊ तुषार उगले हा भाटगाव नजीक असलेल्या बाभूळगाव येथील एस. एन. डी. शिक्षण संस्थेच्या डिप्लोमा महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षणानिमित्त सध्या तो भाटगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे मंगळवारी दुपारी बंधाऱ्यात पोहोण्यासाठी गेले होते. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत
या दुर्घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे, सहाय्यक उपनिरीक्षक किरण सोनवणे, हवालदार सचिन राऊत, मधुकर जेठे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने बंधाऱ्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, येवला उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.