कोझिकोड: रुग्णवाहिकेचा दरवाजा न उघडल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केरळच्या कोझिकोडमध्ये घडली. रुग्णवाहिकेचा दरवाजा घट्ट बसला. तो जवळपास अर्धा तास उघडलाच नाही. त्यामुळे ६६ वर्षांच्या व्यक्तीला प्राण गमवावा लागला. कोयामोन असं रुग्णाचं नाव आहे.

कोयामोन यांना सोमवारी दुचाकीनं धडक दिली. दुपारच्या जेवणानंतर हॉटेलबाहेर पडत असताना ही घटना घडली. हायवे ओलांडताना कोयामोन यांचा अपघात झाला. त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे चांगल्या उपचारांसाठी डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर कोयामोन यांना कोझिकोड वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर रुग्णवाहिकेचा दरवाजाच उघडला गेला नाही.
नादच केलाय थेट! पोलीस बुलडोझर घेऊन पोहोचले महिलेच्या सासरी; नेमकं घडलं तरी काय?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेच्या चालकासह तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी दार उघडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र दार उघडत नाही. अखेर कुऱ्हाडीनं दार तोडण्यात आलं. त्यावेळी ते उघडलं. मात्र यामध्ये अर्धा तास वाया गेला. रुग्णवाहिकेचं दार उघडलं, त्यावेळी कोयामोन यांचा मृत्यू झाला होता.

रुग्णवाहिकेत कोणत्याच सुविधा नव्हत्या. रुग्णाला बेडला बांधून ठेवण्यासाठीही कोणतीच सोय नव्हती, असा आरोप कोयामोन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. रुग्णवाहिकेत डॉक्टर होते. मात्र रुग्ण दगावेपर्यंत त्यांना कोणतीच मदत केली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबानं केला. रुग्णवाहिका अतिशय जुनी असून त्यात कोणत्याच सुविधा नसल्याचं डॉक्टरांनी आपल्याला आधी सांगितलं होतं, असा आरोप कोयामोन यांच्या नातेवाईकांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here