सन्याम यांचा पाकिस्तानी जर्सीतील फोटो व्हायरल झाला. ते वास्तव्यास असलेल्या बरेलीपर्यंत फोटो पोहोचला. पाकिस्तानला पाठिंबा देताना भारतीय व्यक्ती अशा कॅप्शनसह अनेकांनी सन्याम यांचा फोटो फॉरवर्ड केला. यानंतर जैस्वाल यांच्या कुटुंबाला धमक्या मिळू लागल्या. अनेकांनी जैस्वाल यांनी ट्विटमध्ये टॅग केलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वरिष्ठ पोलिसांनी जैस्वाल यांच्याविरोधात कारवाई करावी, एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
जैस्वाल कुटुंबाचा बरेलीत मद्यविक्री आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. बरेलीतील कुटुंबियांनी सन्याम यांना तातडीनं फोन केला आणि स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. यानंतर सन्याम यांनी लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली. ‘अनेकांप्रमाणे मीदेखील भारतीय क्रिकेट संघाचा चाहता आहे. मी माझ्या मित्रासोबत दुबईतील सामना पाहण्याची योजना आखली होती. माझा मित्र अमेरिकेहून दुबईला आला होता. स्टेडियमबाहेर असलेल्या दुकानात मला भारतीय जर्सी मिळाली नाही. मात्र पाकिस्तानी जर्सी उपलब्ध होती. त्यामुळे मी ती खरेदी केली. पाकिस्तानी जर्सी घालून हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा द्यायच्या आणि पाकिस्तानी चाहत्यांना चिडवायचं असा विचार मी केला. मात्र त्यामुळे असं काहीतरी घडेल याचा विचारही मी केला नव्हता,’ असं सन्याम जैस्वाल यांनी सांगितलं.
माझ्या भावना आणि हेतू शुद्ध होता. मी पाकिस्तानी जर्सी परिधान केली होती. मात्र माझ्या हातात भारतीय राष्ट्रध्वज होता. माझ्या वडिलांना हृदय विकाराचा त्रास आहे. सध्या कुटुंबावर येत असलेल्या ताणतणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सध्या प्रत्येकजण मला देशद्रोही म्हणत आहे, अशा शब्दांत सन्याम यांनी त्यांची व्यथा मांडली.
घडत असलेला प्रकार अतिशय वाईट आणि दु:खद असल्याची भावना जैस्वाल कुटुंबातील एकानं स्वत:ची ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. ‘सन्यामकडे एक व्हिडीओ आहे. त्यात एक पाकिस्तानी चाहता त्याला तुम्ही भारताला पाठिंबा का देत आहात, असा प्रश्न विचारत आहे. तो भारतद्रोही नाही हे सिद्ध करायला त्याला नेमकं काय करावं लागेल?’, असा सवाल जैस्वाल कुटुंबातील एकानं उपस्थित केला.