वृद्ध माणूस मृतदेहाच्या जवळ बसला आहे. तो काहीच बोलत नाही. त्याला फार काही बोलता येत नाही. त्यांना फार काही माहीत आहे असं वाटत नाही, अशी माहिती आम्हाला बलवंत यांच्या शेजाऱ्यांकडून मिळाल्याचं पोलीस अधिकारी पॉल चंद यांनी सांगितलं.
शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस बलवंत यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना बलवंत सिंग मुलाच्या मृतदेहाशेजारी बसलेले दिसले. बलवंत यांना पुरेशी शुद्ध नव्हती. ते बरेच अशक्त वाटत होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बलवंत सिंग यांच्या घरात आढळून आलेला मृतदेह त्यांच्या मुलाचा आहे. बलवंत यांना स्वत:ची मुलं नाहीत. त्यांनी सुखविंदरला दत्तक घेतलं होतं. त्यांच्या घरात इतर कोणी यायचं का, याची मला फारशी माहिती नाही, असं बलवंत यांच्या शेजाऱ्यानं सांगितलं.
बलवंत सिंग गेल्या महिन्याभरापासून घरातच होते. ते कोणाशी फारसे बोलले नाहीत. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. ती वाढल्यानं आम्ही पोलिसांना फोन केला, असं बलवंत यांचे शेजारी म्हणाले.