शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्यासह ज्योती ठाकरे, संजना घाडी, आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पेडणेकरांना बळ, कीर्तिकरांवर विश्वास
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी पर्यायाने शिवसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तिवाची लढाई आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या भाजप नेत्यांच्या टीका आरोपांना पेडणेकर तोडीस तोड उत्तर देतायेत. शिवसेनेसाठी मुंबईतून किल्ला लढवतायेत. त्याच पेडणेकरांना ठाकरेंनी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बळ दिलं आहे. तर ज्येष्ठ नेते लीलाधर डाकेंनंतर खासदार कीर्तिकरांच्या मुलावर देखील जबाबदारी देऊन उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत आणि ज्येष्ठांचा मान राखतानाच त्यांच्या नव्या पिढीला देखील प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
नेतेपदाची नावेही जाहीर
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच नेतेपदाची नावेही जाहीर केली होती.यामध्ये शेवटपर्यंत साथीला राहणाऱ्या अरविंद सावंत आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना प्रमोशन मिळालं तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांच्या मुलावर देखील ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
उद्धव ठाकरे घेताहेत निष्ठावंतांची विशेष काळजी
एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष कोणाचा, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगानेही तत्परतेने हालचाली करत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पक्षात कशाप्रकारे उभी फूट पडली आहे, हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता. हा धोका वेळीच ओळखून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे.