मालेगाव: पोहताना हृदयविकाराचा झटका आल्यानं १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील मालेगावात ही घटना घडली. जयेश भावसार असं मृत मुलाचं नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शहरातील शिवाजी नगर भागात अस्पायर क्लब आहे. तिथे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये जयेश नेहमी पोहायला जातो. २८ ऑगस्टलाही(रविवारी) जयेश स्विमिंग पुलमध्ये पोहायला गेला होता. पोहत असताना त्याला त्रास जाणवला. त्यामुळे तो स्विमिंग पुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्रास वाढल्याने त्याला बाहेर येणं जमत नव्हतं. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्याला पुलमधून बाहेर काढले. त्याचे पोट दाबून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तोंडाद्वारे श्वास दिल्यानंतर एकदा जयेश उठला. मात्र त्यानंतर त्याला मृत्यूने गाठले.