शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र करोनानंतर पहिल्यांदाच दोन वर्षांनी सुरुवात होणाऱ्या गणेश उत्सवाची जोरदार सुरुवात करत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मिरवणुकीत गुलाल, डीजे, ढोल-ताशे लावून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्याचे आवाहन केलं आहे. ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीप्रमाणे आम्ही सण साजरे करतोय त्या पद्धतीने आम्ही सण साजरे करणार. याच्यात कोणत्याच प्रकारचं दुमत नाही, असंही बांगर यांनी यावेळी सांगितलं. हिंगोलीत तुम्हाला गणेशोत्सव साजरा करायचा नाही तर मग पाकिस्तानात तुम्हाला गणेशोत्सव साजरा करायचा आहे का? असा सवालही बांगर यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीत गणेश भक्तांनी स्टेज उभारणी करताना रस्त्यावर खड्डे खोदल्यास किंवा रहदारीस अडथळा निर्माण केल्यास थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा देणाऱ्या हिंगोली पालिकेचा देखील आमदार बांगर यांनी समाचार घेत पालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. मात्र, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व आमदार संतोष बांगर यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे गणेश मंडळाचे पदाधिकारी चांगले संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे हिंगोलीत आगमन होण्यापूर्वीच विघ्नहर्ताच्या मिरवणुकीत संकट उभे राहिले आहे.