पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात १७ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. यादरम्यान गावातच मुलीच्या काकांच्या घरात भाडेकरारावर लक्ष्मी मावशी नामक महिला राहते. या महिलेसोबत मुलीच्या कुटुंबियांची ओळख आहे. २१ ऑगस्ट रोजी लक्ष्मी या महिलेने मुलीच्या आईला तिच्या लग्नाविषयी सांगितले. जळगाव शहरातील एक चांगलं स्थळ असून मुलीला जळगावात घेवून जाते असं महिलेने मुलीच्या आईला सांगितले. मुलाकडे जाऊन बघण्याचा कार्यक्रम करुन येते असे लक्ष्मी हिने मुलीच्या आईला सांगितले. त्यानुसार लक्ष्मी हिच्यावर विश्वास ठेवत मुलीला तिच्या आईने लक्ष्मीसोबत जळगावात पाठविले.
२२ ऑगस्ट रोजी लक्ष्मी ही मुलीला घेवून जळगावात आली. यादरम्यान कुसूंबा या गावात लक्ष्मी मुलीला सोबत घेवून गेली. दुसऱ्या दिवशी एका गावात जाऊन लक्ष्मी हिचा दीर आणि त्याच्या बायको यांनी एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मुलगा वयाने मोठा असल्याने मुलीने लग्नास नकार दिला. या गोष्टीसाठी लक्ष्मी हिने तिचा दीर आणि त्याच्या बायकोकडून पैसे घेतले होते. ते पैसे परत कर म्हणून लक्ष्मीकडे तिच्यास दोघांनी मागणी केली. हीच बाब मुलीने ऐकून घेतली. मुलीचा नकार असतांनाही तिचा होकार मिळवण्यासाठी लक्ष्मीने मुलीला तीन दिवस जळगाव शहरात ठेवले.
यादरम्यान लक्ष्मी मुलीला तरुणाच्या घरी घेऊन गेली. मात्र, यानंतरही मुलीने नकार दिला. जबरदस्तीने विवाह लावून देतील म्हणून मुलीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता लक्ष्मी हिने मारहाण केली. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने गर्दी जमा झाली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मुलीला सोबत घेत तिला बालसुधारगृहात दाखल केले. याप्रकरणी बालकल्याण समितीसमोर मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी लक्ष्मी हिच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.