रत्नागिरी : शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. जे नेते वर्षानुवर्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत होते, तेच नेते आता ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत. कोकणातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेले रामदास कदम हेदेखील अशाच नेत्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम हे वारंवार उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. आता गणेशोत्सवासाठी जामगे येथे आपल्या गावी आलेल्या कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना पुन्हा एकदा उद्धव यांच्यावर टीकेची झोड उठवत शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला आहे.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास वेळेत झाला. या प्रवासाला आधी १५ ते २० तास लागत होते. मात्र आता साडेचार पाच तासात खेडला गणेशभक्त आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता, खड्डे भरले गेले, जड वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद ठेवल्या. त्यामुळे प्रवास यावर्षी सुखाचा झाला. आपले सरकार आता आलं आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणात येण्यासाठी ३५० मोफत एसटी बसेस दिल्या. हे पहिल्यांदाच घडलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना जे जमलं नाही असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतले आहेत,’ असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेनेच्या माजी खासदाराने शिंदे गटात प्रवेश करताच ओमराजे संतापले; दिला आक्रमक इशारा

‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. पोलिसांना १५ लाख रुपयांत घरे हा सगळ्यात चांगला आणि मोठा निर्णय तातडीने घेतला. जे पोलीस दिवसरात्र रक्षणासाठी काम करतात, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे,’ असंही कदम यांनी म्हटलं आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here