जळगाव: काही दिवसांपूर्वी ५० खोके व एकदम ओके यावरुन शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांवर राज्यभरातून सर्वत्र टीका केली जात आहे. याच अनुषंगाने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवातही शिंदे गटाचे (Eknath Shinde Camp) आमदार यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याने अंगात ‘५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट परिधान केल्याचं पहायला मिळाले.

युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया हे युवासेनेचे विभागीय सचिव आहे. युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने काव्य रत्नावली चौकात बुधवारी युवाशक्ती फाऊंडेशनअंतर्गत सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची यंदाही प्रचंड जल्लोषात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान शहरात काढण्यात आलेल्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवाशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकत्याने अंगात ‘५० खोके व एकदम ओके’, असा संदेश असल्याचे टीशर्ट परिधान केल्याचं पहायला मिळालं. तसेच यावेळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषाबरोबरच ५० खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गणेशोत्सवाचे दहाही दिवस कार्यकर्त्यांच्या अंगात हा टीशर्ट राहणार असून याद्वारे युवासेना शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधणार आहे. एकंदरीतच गणेशोत्सवाद्वारे सुध्दा युवासेनेने शिंदे गटाच्या आमदारांना डिवचले आहे.
‘महापालिकेचे खोके, मातोश्री ओके’; भाजपच्या घोषणाबाजीने शिंदे गटातील आमदार बुचकळ्यात

राष्ट्रवादी काँग्रेसही टी-शर्ट वाटणार

शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. पावसाळी अधिवेशानात विरोधकांच्या ‘५० खोके, एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधारी चांगलेच वैतागले होते. याच घोषणेवरून राज्यभरात रान उठवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर मांडला. ‘५० खोके, एकदम ओके’ अशा आशयाचे टी शर्ट छापून त्याचे प्रत्येक मतदारसंघात वाटप करण्यात यावे, अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. या सूचनांचं जयंत पाटील यांनी कौतुक करत अशा पद्धतीनेच स्थानिक पातळीवर रान पेटवायला सुरुवात केली पाहिजे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here