mukesh ambani going to launch campa cola again: पुढच्या काही महिन्यांत कोला बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कोला बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. ८० आणि ९० च्या दशकात बाजार गाजवणारा कॅम्पा कोला पुन्हा एकदा बाजारात दिसणार आहे.

रिलायन्स उद्योग एफएमसीजी क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्याचसाठी रिलायन्सनं कॅम्प कोला ब्रँड खरेदी केला आहे. कधीकाळी बाजारात अग्रगण्य असलेला ब्रँड खरेदी करून रिलायन्सनं मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे लवकरच कोला बाजारात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत कॅम्पा कोला नव्या रुपात तीन फ्लेवरमध्ये बाजारात येऊ शकतो. कोलासोबतच लेमन आणि ऑरेंज फ्लेवर लॉन्च करण्यात येईल.
कोला बाजारात उतरत असलेल्या रिलायन्सची थेट लढत कोका कोला आणि पेप्सिकोशी असेल. याचा फायदा ग्राहकांना होईल. कॅम्पा कोला बाजारात आल्यानं दर युद्धाला तोंड फुटू शकतं. त्यामुळे ग्राहकांना कमी दरात शीतपेय उपलब्ध होऊ शकेल. रिलायन्स सुरुवातीला कॅम्पा कोला आपल्या रिटेल स्टोअर्स, जियोमार्ट आणि किराणा स्टोर्सवर विक्रीस ठेवेल. एफएमसीजी क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्याच्या हेतूनं रिलायन्सनं कॅम्पा कोलाची खरेदी केली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.