वजनदार केंद्रीय मंत्र्यांपासून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक नेते आज पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबरच हे नेते शहरातील मानाच्या तसेच अन्य काही गणपती मंडळांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे दिवसभर शहरात राजकीय धूळवड उडणार असल्याची चर्चा आहे.
पुणे फेस्टिव्हल भाजपमय
पुणे फेस्टिव्हल हा पुण्याच्या राजकारणात एकेकाळी मोठा दबदबा असणारे आणि शहराचे सीईओ अशी ख्याती मिरवणारे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेला महोत्सव. देशभर ख्याती असलेल्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन आतापर्यंत कॉंग्रेसच्या नेत्यांनीच केले आहे. यंदा मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते फेस्टिव्हलचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, कलमाडी आणि भाजपचे सूर जुळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
आज या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात कलमाडी आणि भाजपच्या जवळकीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
कलमाडी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन ‘पावन’ होणार?
२०११ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळाप्रकरणामुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागले होते. त्यामुळे एकेकाळी पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या सुरेश कलमाडी यांची राजकीय इनिंग अचानक संपुष्टात आली होती. काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. मात्र, आता १० वर्षे उलटूनही काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना लांब ठेवले आहे. सुरेश कलमाडी यांच्याविरुद्धचा खटला अजूनही सुरु असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता सुरेश कलमाडी यांनी स्वत:वरील कलंक धुवून काढण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन ‘पावन’ होण्याचा मार्ग स्वीकारला आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.